दुष्काळी प्रश्नांवर आमदार विलास भुमरे आक्रमक; पीककर्ज अडविल्यास बँक मॅनेजरला भरला दम!

0
download

पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करा; रोजगार हमीची कामे सुरू करण्याचे प्रशासनाला निर्देश

पीककर्ज, सिबिल स्कोअर, पीकविमा, चारा-पाणी आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर पंचायत समितीत सविस्तर आढावा

पैठण | प्रतिनिधी अविनाश गर्डे

पैठण तालुक्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पीककर्जाची अडचण आणि आर्थिक संकटाचे सावट गडद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विलास भुमरे यांनी प्रशासनाच्या आढावा बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. “शेतकऱ्यांचे पीककर्ज अडविणाऱ्या बँक व्यवस्थापकांची टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड इशारा देतानाच पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करू नका, नागरिकांना वेळेत पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या आणि रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस पंचायत समितीच्या सभापती वैशाली विनोद बोंबले, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, अप्पासाहेब निर्मळ, नंदू पठाडे, कार्यकारी अभियंता गणेश हासे, कृषी अधिकारी विकास पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, राजेंद्र वाघमोडे, मनोज गायके, अनिकेत धायकर, सतीश अंधाळे, दादा गलांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज, पीकविमा आणि शेतीसाठी आवश्यक सुविधा वेळेत मिळणे, नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होणे आणि मजुरांना रोजगार मिळणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. आमदार विलास भुमरे यांनी बैठकीत घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित विभाग आणि बँक व्यवस्थापनाकडून कितपत तत्परतेने कार्यवाही होते, याकडे आता पैठण तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पैठण येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील पाणीपुरवठा, पीककर्ज, पीकविमा, कृषिपंपांचा वीजपुरवठा, सिंचन व्यवस्था, रोजगार हमीची कामे आणि पशुधनासाठी चारा-पाण्याची उपलब्धता अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. दुष्काळाच्या संकटात नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार भुमरे यांनी मांडली.

तसेच

पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक नको!

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले असताना त्यांना वेळेत पीककर्ज मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, सिबिल स्कोअर आणि अन्य कारणांचा आधार घेत काही शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ही बाब गंभीर आहे, असे सांगत आमदार भुमरे यांनी बँक व्यवस्थापकांना धारेवर धरले.

शेतकऱ्यांचे पीककर्ज विनाकारण अडवू नका; पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण करू नका, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणे गरजेचे असून, पीककर्जाच्या प्रलंबित प्रकरणांबाबत संबंधित बँकांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तसेच

पाणीटंचाईचे संकट गडद होण्यापूर्वी नियोजन करा!

तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा आढावा घेताना जायकवाडी धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठा, हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यांतील उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा यावर सविस्तर चर्चा झाली. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना आमदार भुमरे यांनी दिल्या.

लोहगाव व परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ब्रह्मगव्हाण येथील पंप तातडीने सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मुधलवाडी, एमआयडीसी आणि खोडेगाव येथील पाणी भरण्याच्या मुख्य पॉइंटवर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, यासाठी योग्य नियोजन करण्यास सांगण्यात आले. अनधिकृतरीत्या पाणी घेत असल्याचे आढळल्यास संबंधितांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

रोजगार हमीची कामे सुरू करा; मजुरांना काम द्या!

दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. रोजगाराच्या अभावामुळे शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश आमदार भुमरे यांनी दिले. पाणीटंचाई निवारणासोबतच रोजगारनिर्मितीच्या उपाययोजनांना प्राधान्य देऊन संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पीकविमा, वीजपुरवठा आणि पशुधनाच्या प्रश्नांवरही चर्चा

बैठकीत पीकविम्याच्या अडचणी, कृषिपंपांचा वीजपुरवठा, सिंचन व्यवस्था आणि जनावरांसाठी चारा-पाण्याची उपलब्धता या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होत असल्याने सर्व संबंधित विभागांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपाययोजना कराव्यात, यावर भर देण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed