धुळे सोलापूर हायवेला मकरणपूर जवळ अपघातात ऊसतोड मजुराचा मृत्यू; पत्नी, तीन मुलांसह कुटुंबाचा आधार हरपला कन्नड प्रतिनिधी :- रायभान साळवे
कन्नड : मकरणपूर येथील दि.८ सायंकाळच्या सुमारास उड्डाणपुलाजवळ झालेल्या अपघातात प्रकाश भावराव गायकवाड (वय ३४) या ऊसतोड मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रकाश गायकवाड हे ऊसतोड मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. कष्ट करून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्रकाश यांचा असा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रकाश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार हरपल्याने पत्नी आणि मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून, या दुःखद प्रसंगामुळे गायकवाड कुटुंबावर संकट ओढवले आहे.
– दि. ९ रोजी सकाळी ११ वाजे च्या सुमारास राहत्या घरी गावाकडील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले.
दरम्यान, कन्नड बायपास ते अंधानेर बायपासदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर प्रकाशदिवे असूनही पुरेसा उजेड मिळत नसल्याच्या तक्रारींसह अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था, स्पष्ट दिशादर्शक फलक आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
