मानवत येथील महाकाली प्रतिष्ठानचा पावनखिंडीचा देखावा ठरतोय आकर्षण “शौर्य, त्याग, स्वराज्यनिष्ठेचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न” महाराष्ट्र,परभणी/प्रतिनिधी:- रमेश मुलगीर
परभणी जिल्ह्यातील मानवत येथे विश्वकर्मा मंदिरामध्ये मानवत नवरात्र दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील शिवाजीनगर येथील महाकाली प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेला पावनखिंडीचा ऐतिहासिक देखावा नागरिक आणि भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासातील शौर्यपूर्ण प्रसंगाला उजाळा देणारा हा देखावा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी महिनाभर मेहनत घेऊन उभारला आहे. या उपक्रमासाठी मनोज ग्राफिक्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यरक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी घोडखिंडीत शत्रूला रोखून धरत अतुलनीय शौर्य गाजवले. त्याग, निष्ठा आणि स्वराज्याप्रती समर्पणाचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक प्रसंगाला पावनखिंडीच्या देखाव्यातून उजाळा देण्यात आला आहे. नव्या पिढीला स्वराज्याचा इतिहास समजावा, वीरांच्या बलिदानाची जाणीव व्हावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी अभिमान निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या देखाव्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्याच्या निर्मितीसाठी महिनाभर परिश्रम घेतले. देखाव्यातून शौर्य, त्याग, एकजूट आणि स्वराज्यनिष्ठेचा संदेश देण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची मेहनत, कलात्मक मांडणी आणि ऐतिहासिक विषयाची निवड यामुळे महाकाली प्रतिष्ठानचा हा देखावा नवरात्र महोत्सवातील आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मंडळाच्या सर्व सभासदांनी मेहनत घेऊन हा देखावा तयार केला आहे
