पत्रकारितेतील संघटनात्मक नेतृत्वाची मोठी जबाबदारी नयन मोंढे यांच्याकडे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विदर्भ अध्यक्षपदी पुनः नियुक्ती**
विदर्भातील पत्रकारांच्या हक्कांसाठी आता अधिक प्रभावी लढा:संघटन विस्ताराला मिळणार नवी दिशा
अमरावती : पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारितेच्या सन्मानासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या विदर्भ अध्यक्षपदी अमरावतीचे पत्रकार नयन मोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे विदर्भातील पत्रकार संघटनेच्या कार्याला नवे नेतृत्व, नवी ऊर्जा आणि अधिक व्यापक दिशा मिळणार असल्याची भावना पत्रकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश सोमाणी व राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार नयन मोंढे यांची विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी यासंदर्भातील अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्यावर पुनः विदर्भ विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नयन मोंढे यांनी आपल्या निर्भीड व प्रभावी कार्यशैलीमुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विविध प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडत सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे.
विदर्भ अध्यक्ष म्हणून आता त्यांच्यावर विदर्भातील पत्रकारांना संघटित करणे, पत्रकारांच्या विविध समस्या व मागण्यांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करणे, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच संघटनेचा विस्तार जिल्हा व तालुकास्तरापर्यंत अधिक भक्कमपणे करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पत्रकार संघटनेच्या ध्येय-धोरणांच्या अधीन राहून विदर्भात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सक्रियपणे कार्य कराल, अशी अपेक्षा संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नयन मोंढे यांच्या नियुक्तीचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विदर्भ विभागाच्या कार्याला नवी उंची मिळेल आणि पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावी व्यासपीठ प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.नयन मोंढे यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर

