मानवतच्या शिरपेचात मानाचा तुरा! “मानवतचा सुपुत्र ओम तुकाराम मुंडे याची रणजीच्या मैदानात दमदार एन्ट्री” परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
मानवत शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, मानवतचे सुपुत्र ओम तुकाराम मुंडे याची प्रतिष्ठित बीसीसीआयच्या (BCCI) रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी ओडिशा क्रिकेट संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे मानवतसह संपूर्ण परभणी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानवत येथील मार्गदर्शक व प्राचार्य डॉ. प्रा. तुकाराम मुंडे सर यांचे चिरंजीव असलेल्या ओम मुंडे याने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण क्रिकेट सरावाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित रणजी स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध क्षेत्रांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ओमची रणजी ट्रॉफीसाठी झालेली निवड ही केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवत शहरासाठी आणि परभणी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. आपल्या मातीत घडलेला हा युवा खेळाडू आता राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटच्या मैदानावर आपल्या प्रतिभेची छाप उमटविण्यास सज्ज झाला आहे.
ओमच्या क्रिकेट कारकिर्दीतील ही महत्त्वपूर्ण संधी असून, रणजीसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याने त्याच्या पुढील क्रिकेट प्रवासाला निश्चितच नवी दिशा मिळणार आहे. त्याच्या मेहनतीला आणि प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळाल्याने मानवतच्या क्रीडा क्षेत्रातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे.
ओमच्या या यशाबद्दल मानवतकरांकडून त्याचे कौतुक होत असून, त्याने भविष्यात भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत खेळावे, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करीत आहेत. रणजीच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या शहराचे आणि जिल्ह्याचे नाव देशभर उज्ज्वल करण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“अभिनंदन ओम! मानवतला तुझा सार्थ अभिमान आहे!” असे म्हणत नागरिक, क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी ओम मुंडे याला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
