*प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड*;
*प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड*;
“जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब”
परभणी/प्रतिनिधी रमेश मुलगीर
परभणी महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. जुनी नोंद उपलब्ध असतानाही किरकोळ स्पेलिंग चुकांसाठी “कोर्टातून आदेश आणा” असे सांगून अर्ज परत केले जात आहेत. ऑनलाइन अर्ज करूनही चार-चार महिने मंजुरी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.
या प्रश्नावर आज मुस्लिम अधिकार परिषदेच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी मा. संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन तक्रार केली व किरीट सोमय्या यांचा अनावश्यक हस्तक्षेप बंद करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य आदेश दिले नसल्याचे सांगत निवेदन मनपा आयुक्तांकडे पाठवले.
त्यानंतर मनपा आयुक्त श्री. नितीन नार्वेकर यांची भेट घेऊन नागरिकांचा त्रास तातडीने थांबवावा आणि जाणीवपूर्वक स्पेलिंग मिस्टेक करून त्रास देणाऱ्या नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी केली. आयुक्तांनी नियमानुसार दाखले देण्याचे तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मंजुरीच्या प्रक्रियेतील अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.
आश्वासनानंतरही तोडगा न निघाल्यास मुस्लिम अधिकार परिषद आंदोलन करणार!
यावेळी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
