*जलजीवन मिशनचे रखडलेले काम आठ दिवसात पूर्ण करा, अन्यथा १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण*
“शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांचा जीवन प्राधिकरणाला इशारा”
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
मौजे. लोणी बु. ता. पाथरी येथील जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा दि. १ नोव्हेंबर २०२६ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख रवींद्र रामकिशन धर्मे यांनी दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी आज दि. १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, परभणी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत लोणी बु. येथील काम तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असून गावातील सर्व पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. तरुगव्हाण बंधारा येथील विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ संबंधित ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे व निष्क्रियतेमुळे लोणीकरणांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे लोणी व अंतर्गत येणारे चार तांडे येथील नागरिकांची पाण्यासाठी मोठी भटकंती सुरू आहे.
तरी या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन आठ दिवसाच्या आत लोणीकरणांना पाणीपुरवठा सुरू करावा, व संबंधित ठेकेदारास तातडीने आदेश द्यावेत. जर मुदतीत काम झाले नाही तर गावकऱ्यांच्या वतीने कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे व माजी जि.प. सदस्य रणजित जिजाभाऊ गिराम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
