बळीराजा शेतकरी संघाचा लोकप्रतिनिधींना थेट इशारा! :- धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अक्षरशः नुकसान होत असल्याचा आरोप आहे! कष्टाने पिकवलेले धान आणि मका वन्यप्राणी फस्त करत असताना शेतकऱ्यांनी नेमका न्याय मागायचा तरी कोणाकडे? पिकांचे नुकसान सहन करायचे आणि नुकसानभरपाईसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवायचे, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. आता मात्र शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे! बळीराजा शेतकरी संघाने आक्रमक पवित्रा घेत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील आमदार-खासदारांना थेट इशारा दिला आहे. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलावा अन्यथा तुमच्या घरावर शेतकरी मोर्चा काढू! असा स्पष्ट इशारा बळीराजा शेतकरी संघाने दिला आहे.

0
download

:- रानडुकरांचा उपद्रव, पिकांची नासधूस आणि नुकसानभरपाईचा प्रश्न… या तिहेरी संकटात गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी अडकले आहेत! जंगलालगतच्या शेतांमध्ये रानडुकरांसह इतर वन्यप्राणी घुसून धान आणि मका पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याची परिस्थिती आहे.शेतीसाठी पैसा खर्च करायचा, दिवसरात्र मेहनत घ्यायची आणि ऐन पीक हातात येण्याच्या वेळी वन्यप्राण्यांनी नुकसान करायचे! अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान सहन करायचे तरी किती दिवस? त्यातच नुकसानभरपाई मिळवताना वन विभागाच्या नियम आणि अटींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याच प्रश्नावर आता बळीराजा शेतकरी संघाने आक्रमक भूमिका घेत संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले आहे.रानडुकरांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधून वगळा किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्या! अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. केवळ आश्वासने नकोत, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्या, अशी भूमिका घेत संघटनेने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील आमदार-खासदारांनाही निवेदने दिली आहेत. आता शेतकऱ्यांच्या या मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र, यावेळी शेतकरी केवळ निवेदन देऊन थांबणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बळीराजा शेतकरी संघाने आंदोलनाचा इशारा देत लोकप्रतिनिधींना थेट आव्हान दिले आहे. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला नाही, तर आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चा काढणार! असा इशारा संघाणे दिला आहे

रानडुकरांचा बंदोबस्त, पिकांच्या नुकसानीची भरपाई आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ठोस उपाययोजना… या मागण्यांसाठी आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी हा मुद्दा किती गांभीर्याने मांडतात आणि शासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळणार की बळीराजाला पुन्हा आश्वासनांवरच समाधान मानावे लागणार? रानडुकरांच्या उपद्रवामुळे होणारे नुकसान आणि भरपाईचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. प्रति एकर २५ हजार रुपये नुकसानभरपाईच्या मागणीसह बळीराजा शेतकरी संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेची दखल घेतली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed