पैठण पोलिसांची सायबर गुन्हेगारीविरोधात अनोखी मोहीम! शासकीय वाहनावर जनजागृतीचे बॅनर; स्पीकरद्वारे ऑडिओ संदेशातून नागरिकांना सायबर सुरक्षेचा धडा पैठण अविनाश गर्डे
सध्या डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्हेगारीच्या घटनांपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पैठण पोलिसांनी जनजागृतीचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सायबर जनजागृती महिन्याच्या निमित्ताने पैठण पोलीस स्टेशनच्या वतीने शासकीय वाहनाचा प्रभावी जनजागृतीसाठी उपयोग करण्यात येत असून, या उपक्रमातून नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली जात आहे.
या उपक्रमांतर्गत पोलीस स्टेशनच्या शासकीय वाहनावर सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी दर्शविणारे जनजागृतीपर बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच वाहनावर स्पीकर बसवून सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देणारी सुमारे १५ मिनिटांची ऑडिओ क्लिप प्रसारित केली जात आहे.
महत्त्वाच्या ठिकाणी वाहन उभे करून जनजागृती
पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी हे वाहन उभे करून नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यात येत आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक, अनोळखी फोन कॉल, ओटीपीची मागणी आणि विविध डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
डिजिटल व्यवहार करताना अनोळखी व्यक्तीला ओटीपी, बँक खात्याची गोपनीय माहिती किंवा पासवर्ड देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि फसवणूक झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन या जनजागृती मोहिमेतून करण्यात येत आहे.
नागरिकांची जागरूकता हाच सायबर गुन्हेगारीला प्रतिबंध करण्याचा प्रभावी मार्ग असून, पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे.
या उपक्रमात पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्यासह पोलीस स्टेशनमधील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

