आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा
जिल्हाधिकारी मंदार पत्की
:- गोंदिया दि.28
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, या कालावधीत सर्व विभागप्रमुखांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले.
आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी निवडणूक कालावधीत प्रशासनाच्या कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून, तर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेनुसार 29 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 ऑक्टोबर रोजी होणार असून, उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे. मतदान 23 ऑक्टोबर 2026 रोजी, तर मतमोजणी 27 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण होईल.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या कार्यालयातील कामकाजावर आवश्यक नियंत्रण ठेवावे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर होणार नाही तसेच कोणत्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले.
