नांदेड | हदगाव | अतुल राऊतराव गणेश मंडळाचा समाजोपयोगी उपक्रम
हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे जयश्रीराम गणेश मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला पांदन रस्ता लोकसहभागातून दुरुस्त करून उपयोगात आणण्यात आला. मंडळाच्या या उपक्रमाचे पोलीस प्रशासनाकडूनही कौतुक करण्यात आले.
गणेशोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा बरडशेवाळा येथील जयश्रीराम गणेश मंडळाने यंदाही कायम ठेवली.
गावातील पांदन रस्ता खराब असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांची गैरसोय होत होती. मंडळाने पुढाकार घेत जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने लोकसहभागातून रस्त्याची दुरुस्ती केली.
यावेळी सपोनि विलास चवळी यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांमधून इतर गणेश मंडळांनी प्रेरणा घ्यावी, असे सांगितले.
साहेबराव दहिभाते, शिवाजीराव सोनुने, प्रभाकर दहिभाते, रामेश्वर दहिभाते, आकाश दहिभाते आणि शिवाजी दहिभाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
ट्रॅक्टर चालक-मालक विजय दहिभाते व नितेश दहिभाते यांनी श्रमदान केले. प्रद्युम्न सुरेश राठोड, सविताताई निमडगे-पळसेकर, पोलीस पाटील दत्तात्रय मस्के आणि राजीव नाईक यांनीही योगदान दिले.
मंडळाचे अध्यक्ष मारोती दहिभाते, उपाध्यक्ष शिवशंकर रणखांब, सचिव गजानन सोळंके यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत जयश्रीराम गणेश मंडळाने ग्रामविकासाचा आदर्श घालून दिला आहे.
