बालकलावंत म्हणजे उद्याच्या महाराष्ट्राची सांस्कृतिक संपत्ती नीलम शिर्के-सामंत यांचे प्रतिपादन*;
“जल्लोष लोककलेचा’ उपक्रमाचे दिमाखात उद्घाटन”
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
महाराष्ट्राच्या मातीतील लोककला, परंपरा आणि संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी बालकलावंतांना व्यासपीठ देणे गरजेचे आहे. ‘जल्लोष लोककलेचा’ हा केवळ कलाविष्कार नसून बालमनाची मशागत करणारा संस्कारसोहळा आहे. या उपक्रमातून बालमनात लोकसंस्कृतीची बीजे रुजत असून, आज घडणारे हे बालकलावंत म्हणजे उद्याच्या महाराष्ट्राची सांस्कृतिक संपत्ती आहे. त्यांच्या कलेतून संस्कृती जपली जाईल आणि त्यांच्या संस्कारातून उद्याचा महाराष्ट्र अधिक समृद्ध, संवेदनशील व उज्ज्वल घडेल, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा तथा चित्रपट अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी केले.
बालरंगभूमी परिषद परभणी जिल्हा शाखेच्या वतीने जिजाऊ ज्ञानतीर्थ, मानवत रोड येथे आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी शाखेचे अध्यक्ष आबा ढोले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मिलिंद बामणिकर, प्राचार्य महेंद्र मोताफळे, किरण रोपळेकर, परीक्षक डॉ. पंकज खेडकर, प्रकाश पंडित, गुंजन राठोड, मंगेश जवळेकर, समीर भोसले यांच्यासह बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट, उपेंद्र दुधगावकर आणि कोषाध्यक्ष संजय पांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमा दरम्यान परभणीचे प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली
लोककलेच्या तालावर बालप्रतिभेचा जल्लोष समूह नृत्य, समूह गायन, एकल वादन, एकल गायन आणि एकल नृत्य अशा पाच कलाप्रकारांत जिल्हाभरातून जवळपास ४०० बालकलावंतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेषतः ग्रामीण भागातील बालकलावंतांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण केले. लोककलेच्या विविध आविष्कारांनी कार्यक्रमस्थळी उत्साहाचे आणि सांस्कृतिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
बालकलावंतांना केवळ स्पर्धेचे व्यासपीठ न देता त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन, लोककलेची ओळख आणि आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष तथा जिजाऊ ज्ञानतीर्थचे सचिव प्रा. नितीन लोहट यांनी केले. सूत्रसंचालन राजू वाघ यांनी केले, तर आभार उपेंद्र दुधगावकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट, कार्याध्यक्ष उपेंद्र दुधगावकर, प्रमुख कार्यवाह त्र्यंबक वडसकर, सहकार्यवाह डॉ. अर्चना चिक्षे, कोषाध्यक्ष संजय पांडे, समन्वयक प्रमोद बल्लाळ, जिल्हा प्रतिनिधी नागेश कुलकर्णी, कार्यकारी सदस्य मनीषा उमरीकर, प्रा. किशोर विश्वामित्रे, सचिन आढे, प्रकाश बारबिंड, संदीप राठोड, अनिकेत शेंडे, राजू वाघ, बालाजी दामुके, रामदास कदम, सुरेश भिसे, अर्जुन भिसे, दिगंबर गडगीळे, श्रीकांत कुलकर्णी
रामजी तळेकर, कौशल पामे यांच्यासह जिजाऊ ज्ञानतीर्थच्या सर्व कर्मचारीवर्गाने आणि बालरंगभूमी परिषदेच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.

