नवीन आव्हानांसाठी शिक्षकांनी प्रशिक्षणातून ‘अपडेट’ व्हावे
“शिक्षण संचालक मंगेश जोशी यांचे आवाहन; पूर्णा तालुक्यातील शाळांचीही केली पाहणी”
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेचे शिक्षण संचालक मंगेश जोशी यांनी केले.
पूर्णा येथील अभिनव विद्या विहार प्रशालेत सुरू असलेल्या इयत्ता तिसरी व चौथीच्या नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणाला त्यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद साधला. पूर्णा तालुक्यातील इयत्ता तिसरी व चौथीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना मंगेश जोशी यांनी प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान, नवीन अध्यापन पद्धती आणि अभ्यासक्रमातील बदल केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्याची प्रभावी अंमलबजावणी वर्गखोल्यांमध्ये करावी. बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाताना शिक्षकांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला ‘अपडेट’ करावे आणि त्याचा लाभ शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावा, असे सांगितले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेडचे प्राचार्य निळेकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, परभणीचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार, वरिष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी किरण सुरोडवार, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी कापशीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणास एकूण ८० प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.
शाळांना भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
शिक्षण संचालक मंगेश जोशी यांनी पूर्णा तालुक्यातील जि. प. प्रशाला एरंडेश्वर तसेच जि. प. प्राथमिक शाळा, लक्ष्मणनगर येथेही भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेचा भौतिक परिसर, शैक्षणिक गुणवत्ता, विविध उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचीही माहिती जाणून घेतली.
पूर्णा तालुक्यात शिक्षक व शाळांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेत त्यांनी शिक्षक व अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.
