*साडेसाती कमी करण्याच्या नावाखाली ७५ वर्षीय वृद्धाची फसवणूक*

0

*साडेसाती कमी करण्याच्या नावाखाली ७५ वर्षीय वृद्धाची फसवणूक*

“हातचलाखीने सोन्या-चांदीच्या अंगठ्या लंपास; ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल”

परभणी/प्रतिनिधी:- रमेश मुलगीर

सोनपेठ, ता. ८ साडेसाती कमी करण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने ७५ वर्षीय वृद्धाचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना सोनपेठ शहरातील बसस्थानक परिसरात घडली. या प्रकरणात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात ७ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रामराव चिकणे यांनी पोलिसांत तक्रार दिली. ( ता. ५ ) रोजी दुपारी ते मुलाच्या दुकानाकडे जात असताना बसस्थानकाच्या गेटजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना गाठले. ‘तुमच्या मनातील गोष्ट ओळखतो,’ असे सांगून त्यांनी काही माहिती सांगितली. तसेच, ‘तुमच्या मागे शनिदेवाची साडेसाती आहे. मंत्राच्या सामर्थ्याने ती कमी करता येईल,’ असे सांगून विधी करण्यास सांगितले.

यासाठी त्यांनी चिकणे यांच्याकडून शंभर रुपयांची नोट घेत त्यावर धातूची वस्तू ठेवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी चांदीची अंगठी ठेवली. मात्र, ‘तुमच्याकडे सोन्याची अंगठी असताना चांदीची अंगठी ठेवल्याने शनिदेव नाराज होतील,’ असे सांगून त्यांच्याकडून सोन्याची अंगठीही घेतली. दोन्ही अंगठ्या कागदात बांधून पुडी चिकणे यांच्याकडे देण्यात आली.

काही अंतर पुढे गेल्यानंतर चिकणे यांनी पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये अंगठ्यांऐवजी दगडाचे खडे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बसस्थानक परिसरात त्या दोघांचा शोध घेतला; मात्र ते मिळून आले नाहीत. त्यानंतर त्यांनी मुलाला प्रकार सांगितला आणि सोनपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फसवणुकीत ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed