आर्य चाणक्यच्या शैक्षणिक यशाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! भास्कर कुलकर्णी यांना ‘राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक’; आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार, पैठण | प्रतिनिधी अविनाश गर्डे
शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर, पैठणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शाळेचे मुख्याध्यापक तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भास्कर कुलकर्णी यांना ‘राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने गौरविण्यात आले, तर आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच सोहळ्यात शिक्षक चळवळीत सक्रिय योगदान देणारे श्री. विनोद सरोदे यांनाही ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या तिहेरी सन्मानामुळे पैठणच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.
पुणे येथील स्विफ्ट अँड लिफ्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
भास्कर कुलकर्णी यांनी शैक्षणिक नेतृत्व, गुणवत्तापूर्ण शिक्षण, नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यात संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यांना महत्त्व देणाऱ्या आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरच्या कार्यालाही ‘आदर्श शाळा’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
शाळेच्या प्रगतीत शिक्षकांचे सामूहिक योगदान, संस्थेचे मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि समाजाचे सहकार्य यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या सन्मानामुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार आहे.
या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे, उपाध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकूर, विद्यासभा अध्यक्ष डॉ. जयंत जोशी, संकुलाचे पालक उमेश जगताप, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. पद्मकुमारजी कासलीवाल, कार्यवाह जुगलकिशोर लोहिया, प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष शिवाजी मारवाडी, माध्यमिक शाळा समितीचे अध्यक्ष नंदकिशोर मालाणी, विजय चाटूपळे, डॉ. राम लोंढे, मनोज शुक्ल, किशोर भाकरे, विजय पापडीवाल, दत्तात्रय पोहेकर, रविंद्र साळजोशी, मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती जोशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले
