मनुष्य आत्म्यांना परमात्म्याचा संदेश मिळणे म्हणजे ज्ञानरूपी तिसरा नेत्र उघडणे होय : ब्रह्माकुमारी मीरा दीदी “नवदुर्गा देवी गणेश नगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन; एक हजार नागरिकांनी घेतला लाभ, १० महिलांना मोतीबिंदू असल्याचे निदान” महाराष्ट्र, परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
सोनपेठ : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त नवदुर्गा देवी, गणेश नगर येथे ब्रह्माकुमारीज सोनपेठ शाखेच्या वतीने सर्व भाविक भक्तांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. ब्रह्माकुमारी मीरा दीदी (सोनपेठ सेंटर इन्चार्ज) यांच्या जनकल्याणकारी संकल्पनेतून आयोजित या शिबिराचा सुमारे एक हजार नागरिकांनी लाभ घेतला. तपासणीदरम्यान १० महिलांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले.
कार्यक्रमाच्या आयोजक व मुख्य मार्गदर्शिका ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, मनुष्याच्या शरीरातील एक अविभाज्य घटक म्हणजे नेत्र होय. त्यासाठीच म्हटले जाते की, ‘नेत्र नाही तर जत्रा नाही.’ शरीर नश्वर आहे, मात्र आत्मा अमर आहे. नेत्रदानाच्या माध्यमातून गरजू व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करता येतो, तसेच परमात्म्याचा संदेश प्राप्त झाल्याने आध्यात्मिक ज्ञानाची दृष्टी विकसित होते.
त्या म्हणाल्या की, ज्या प्रकारे एखादी दृष्टिहीन व्यक्ती दोन्ही डोळ्यांनी जग पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे अध्यात्मज्ञानाची दृष्टी नसलेली व्यक्ती या जगाकडे सुंदर पद्धतीने पाहू शकत नाही. आत्मा, परमात्मा, सृष्टीचक्र तसेच जन्म-मृत्यू यांचे ज्ञान होणे म्हणजेच माणसाचा ज्ञानरूपी तिसरा डोळा उघडणे होय.
‘देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो आणि मी त्या देशाचे देणे लागतो,’ हा विचार जीवनात कायम कार्यरूपाने जपला पाहिजे. हा विचार भविष्यातही समाजसेवेची प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शिबिराचे आयोजन
ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भालचंद्र आय केअर, शंकर शेठ नेत्र रुग्णालय, सोलापूर यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. गरजू नागरिकांना मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच मोतीबिंदूग्रस्त रुग्णांना आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमासाठी नवदुर्गा महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी मीरा सलगर, संता शिंदे, नगरसेवक रंजवे नाना, आरतीचे यजमान व पत्रकार सोमनाथ नागुरे, सुधीरजी बिंदू महाजन, गणेश मुंजाहरी तसेच ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी विशेष परिश्रम घेतले.
मीरा दीदी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार
नवदुर्गा माता मंडळाच्या वतीने कार्यक्रमाच्या आयोजक व जनकल्याणकारी कार्यात सक्रिय असलेल्या आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी मीरा सलगर व संता शिंदे तसेच गणेश नगर येथील महिलांच्या शुभहस्ते मीरा दीदी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी उपस्थित बांधव, माता-भगिनी आणि लहान मुलांसह एकूण सुमारे एक हजार नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. तपासणीदरम्यान १० महिलांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले.
सोनपेठ तालुक्यातील विविध गावांतही मोफत नेत्र तपासणी शिबिरे
नवरात्रोत्सवानिमित्त सोनपेठ शहरातील विविध ठिकाणांसह सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव, सायखेडा, खडका तसेच रेणुका देवी मंदिर, डीघोळ यांसह विविध ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या शिबिरांचा अधिकाधिक भाविक भक्तांनी व गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या २१ वर्षांपासून मीरा दीदी यांचे समाजहिताचे कार्य
ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी बोलताना सांगितले की, ‘जनसेवा हेच माझे जीवन आहे.’ याच भावनेतून गेल्या २१ वर्षांपासून सोनपेठ शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी समाजहिताची कामे करीत आहे. गरजू व्यक्तींना मदत करणे, नागरिकांमध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण करणे आणि समाजकल्याणाच्या कार्यात योगदान देणे हेच आपल्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
