ऊसाला प्रतिटन ₹५ हजार दरासाठी शहागड फाट्यावर एल्गार!

0
download

ऊसाला प्रतिटन ₹५ हजार दरासाठी शहागड फाट्यावर एल्गार!

ऊसदरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा, कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

‘शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम द्या’; कारखान्यांनी दर निश्चित करेपर्यंत ऊसतोड थांबविण्याचे आवाहन

पैठण अविनाश गर्डे

पैठण तालुक्यात ऊसदराचा प्रश्न पेटला असून, उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी शहागड फाटा येथे शेतकऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, छावा संघटना आणि शेतकरी बांधवांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ‘शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे,’ असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
ऊस पिकवण्यासाठी शेतकरी वर्षभर शेतात राबतो. मशागत, बियाणे, खते, औषधे, पाणी, वीज आणि मजुरी यांसारख्या वाढत्या खर्चाचा भार शेतकऱ्यांच्या खांद्यावर आहे. ऊस उत्पादनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करूनही अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची भावना ऊस उत्पादकांमध्ये आहे. त्यामुळे उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करावा, ही मागणी आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे.

कारखान्यांना ऊस हवा, तर शेतकऱ्यांच्या कष्टालाही योग्य किंमत मिळालीच पाहिजे! ऊस उत्पादकांच्या आर्थिक प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता कारखाना व्यवस्थापनाने दराबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.

कारखान्यांनी ऊसदर निश्चित करेपर्यंत ऊसतोड थांबवून आंदोलनाला एकजुटीने साथ द्यावी, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी समस्त ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना केले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे आवाज उठविण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.

शहागड फाटा येथे आंदोलन सुरू झाल्याने ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून, ऊसदराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता कारखानदार या मागणीवर कोणती भूमिका घेतात आणि ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काय निर्णय घेतात, याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.या आंदोलनात माऊली मुळे, पवन शिसोदे, अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, शिवाजी साबळे, धरपळे पाटील, संतोष तांबे, रामेश्वर बावणे, मोहन कणसे, संभाजी साबळे, भगवान सोरमारे, कृष्णा काळे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा घाम, शेतकऱ्यांचे कष्ट आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा दर—यासाठीच हा लढा! उसाला प्रतिटन ₹५ हजार दर मिळावा, या मागणीवर आता कारखानदार काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
पैठण वरून अविनाश गर्डे चाणक्य न्यूज इंडिया.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed