दुचाकींचा अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी”मानवत तालुक्यातील खरबा- करंजी रोडवर शनिवार दुपारची घटना”
मानवत तालुक्यातील खरबा ते करंजी रस्त्यावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार ११ जुलै रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास घडली.
मानवत तालुक्यातील करंजी येथील नितीन अरुण जाधव (वय ३२, हे एमएच २२ एजी ८४५४) क्रमांकाच्या मोटरसायकलवरून करंजीकडे जात असताना, खरबा-करंजी रस्त्यावर झोडगावकडून मानवतकडे येणाऱ्या एमएच १६ डीएन ४०२४ या मोटरसायकलने समोरून जोराची धडक दिली. या अपघातात करंजी येथील नितीन अरुण जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या मोटरसायकलवरील झोडगाव येथील स्वप्नील विष्णू पवार व रामा वामन पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर मृतदेह शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी पोलीस हवालदार शेख जावेद, शक्ति नेताम यांनी पंचनामा केला. जखमींना प्रथम मानवत शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र नंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला हलवण्यात आले आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये संताप
दरम्यान, रूढीपाटी ते खरबा व करंजी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून मोटरसायकल चालवताना मोठी कसरत करावी लागते. या खराब रस्त्यामुळेच झालेल्या अपघातात एका तरुणाचा जीव गेल्याची संतप्त प्रतिक्रिया करंजी व खरबा परिसरातील नागरिक देत आहेत. त्यामुळे ‘आता तरी लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देतील का?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

