वर्धा स्लग . . सफारीत मोबाइलचा सर्रास वापर; वाघांच्या सुरक्षेला धोका बोर व्याघ्र प्रकल्पात नियमाला बगल
अँकर . . वर्धा बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीदरम्यान पर्यटकांसह जिप्सी चालक व गाईडकडून मोबाइलचा सर्रास वापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सफारीदरम्यान वाघाचे जिओ-टॅग फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने वाघांचे तैनातीत लोकेशन उघड होत आहे. यामुळे वाघांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून, वन विभागाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार सफारीपूर्वी पर्यटकांचे मोबाइल गॅझेट जमा करणे अनिवार्य आहे. बोरक्षेत्र व अभयारण्य या दोन्ही गाभा क्षेत्राच्या तिकीट कार्यालयाजवळ आदेशाची प्रतही लावण्यात आली आहे. प्रकल्प संचालकांनी मोबाइल काऊंटरवर जमा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही सफारीदरम्यान मोबाइलचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. २ ऑक्टोबर रोजी बोरधरण सफारी गेटवरून दुपारच्या सफारीत एका पर्यटकाने मोबाइलने काढलेला वाघाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ८ ऑक्टोबर रोजी भंडारा बफर रेंजमधील वग्हा जंगल सफारीदरम्यान पर्यटक मोबाइलद्वारे वाघाचा व्हिडिओ काढत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद होऊन त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जिओ-टॅग फोटोंमुळे सुरक्षेला धोका स्मार्टफोनमध्ये जीपीएस लोकेशन चालू असल्याने काढलेल्या फोटोंमध्ये वाघाचे अचूक ठिकाण नोंदले जाते. हे फोटो सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केल्यामुळे शिकारी किंवा इतर असामाजिक घटकांना वाघाचे लोकेशन सहज कळू शकते.
चालक व गाईडना अभय
सफारीदरम्यान स्वतः जिप्सी चालक आणि गाईड वाघाचे फोटो व व्हिडिओ काढून सोशल मीडियावरील त्यांच्या स्वतःच्या ग्रुपवर टाकतात. कृत्यावर बोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे या चालक व गाईडना अभय मिळत आहे का, असा संताप व्यत्ययांनी व्यक्त केला आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये मोबाइल वापरावर बंदी असून त्याची सूचनाही फलकावर लावण्यात आली आहेत. तरीही मोबाइलचा वापर करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. यासह गाईड्स व जिप्सी चालकांनाही सूचित केले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई केली जाईल. अशी माहिती मंगेश ठेंगडी, उपसंचालक, बोर व्याघ्र प्रकल्प यांनी दीली आहे .
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा
